हमें तुमसे प्यार कितना…


 

39d728f99d397b8b9329616a54558a18

सकाळ-सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरिप सॅमन्थाच्या तोंडावर पडली आणि नापसंतीदर्शक हुंकार भरत तिने तशीच आपली मान बाजुला कलती केली. रात्रीच्या झोपेची ती धुंदी अजुनही तिच्या डोळ्यांवरुन गेलेली दिसत नव्हती. त्या गोड झोपेच्या तंद्रीतच तिने पुन्हा एकदा आपली कुस बदलली. डावा हात पुढे टाकला. अन्..

नकळतच तिच्या चेहर्‍यावर मंद हसू उमटून गेले!

आपल्या जडावलेल्या पापण्या हळूवाSरपणे उघडत तिने त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. तो तिच्या जवळच होता- मॅक.. तिचा मॅक! आणि ती आता त्याच्याच अंगावर हात टाकून स्वस्थ झोपली होती. हलकेसे स्मित करत तिने कौतुकभरल्या नजरेने त्याला न्याहाळले. त्याचे दाट काळे कुरळे केस अगदीच अस्ताव्यस्तपणे तोंडावर विखुरले होते. लांबसडक पापण्यांचे आवरण डोळ्यांवर विसावले होते. मुळचे कोरिव अन गडद गुलाबी रंगाचे ओठ आजही तितकेच अट्रॅक्टीव भासत होते. त्याच्या शांत चेहर्‍याकडे एकटक पाहत तिने त्याच्या गालावरुन हळूच हात फिरवला. तसा तिच्या हाताला खरखरीतपणा जाणवला आणि ती शहारलीच!

‘शी! किती दाढी वाढवून ठेवलेय ही!’ ती मनोमन म्हणाली.

‘ह्म्म- बट आय लव्ह इट.’

ती मधाळ हसली. मग त्याच्या बादामी डोळ्यांकडे पाहत ती आणखी जवळ सरकली. तिला त्याच्या बाहुपाशात जाण्याचा मोह अनावर झाला होता. पण वेळीच तिने तो आवरला. कारण असं करताना मध्येच त्याला जाग आली तर तो तसाच आपल्याला ओढून घेईल आणि..

ती खुदुकन् हसली!

दिसताना किती अगदी शांत वाटतोय पण आहे मात्र पक्का बदमाश.

शेवटी न रहावून तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले अन् त्याचक्षणी तिला किंचीत हालचाल जाणवली.

झटकन् उठून बसत तिने आपला चेहरा दोंन्ही हातांनी झाकून घेतला आणि त्याच्याकडे न पाहताच ती सरळ बाधरुमच्या दिशेने पळत सुटली…

पाचच मिनिटांत ती फ्रेश होऊन परतली. त्यावेळी ती अगदी टवटवीत दिसायला लागली होती. अंगाला मंद जास्मिनचा सुगंध येत होता. केसांच्या टोकांमधून पाण्यांची दवं ठिबकत होती. ती ओलेती केसं एकवटून पुढे घेत तिने बेडरुममध्ये प्रवेश केला, तर तो अजुन झोपलेलाच! त्याला तसं झोपलेलं पाहूनच तिला हसू आलं. त्याच्या जवळ बसत तिने त्याच्या केसांवरुन हात फिरवला.

“मॅक” हळुवार त्याच्या तोंडावर झुकत ती पुटपुटली..

“उठतोयस ना” म्हणताना तिने बळेच त्याला हलवले. पण तो मात्र गाढ झोपला होता. तिच्या कसल्याही आवाजाला त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

“किती झोपतोस रे? बघ- दिवस किती वर आलाय ते..”

“…..”

“मॅक, अरे ऊSठ ना…” एखाद्या छोट्या मुलीने उगीच लाडीक हट्ट करत आपली एखादी आवडती वस्तु मागताना, गाल फुरंगटुन “ए देS..ना!” म्हणाव तशी ती बोलली, पण तो काहीच बोलला नाही. तसा मात्र तिला राग यायला लागला.

“मॅक- काय हे? किती उठवतेय तुला- उठायचं नाही का? कि झोपुनच दिवस घालवणार आहेस सगळा? चल उठ..”

म्हणत ती बेडवरुन खाली उतरली. समोरच्या खिडकीकडे जात तिने खिडकिवरचा पडदा सर्रर्रकन बाजुला केला. खिडकी खोलली. तशी भप्पकन् सकाळ- सकाळच्या ताज्या हवेनी बेडरुम तुडुंब भरुन गेली! कोवळी उन्हं तिच्या अंगावर आली. कितीतरी दिवसांनी या स्वच्छ वातावरणात आल्यासारखं, तिला अगदी प्रसन्न वाटू लागलं. थंड हवेची एक झुळुक मध्येच तिला स्पर्शून पुढे गेली, तशी ती किंचित मोहरली. हसून तिनं डोळे मिटून घेतले, एक दिर्घ श्वास छातीत भर-भरुन घेत- पुन्हा एकदा तिनं मागं वळून बघितलं, तर हा आपला पलिकडे तोंड फिरवून झोपलेला!

“ए मॅक, बस ह्ं आता- उठ चल लवकर! बघ मी तुझ्यासाठी मस्त काहीतरी करुन आणते, तोपर्यंत तू छानपैकी फ्रेश होऊन आलेला असला पाहिजेस ह्ं-“ त्याला बजावत तिने खिडकीवरचा पडदा नीट बंद केला, पुन्हा एकदा त्याला उठायचं सांगून ती खाली किचनमध्ये जायला लागली.

पण सगळ्या घरामध्येच इतका पसारा पडला होता कि तिला काहीच सुचेना. काल काहीच न केल्याने आज हा पसारा पडणे साहजिकच होते. शेवटी शिड्यांपासून हॉलपर्यंतचा पसारा उचलत ती साफसफाई करु लागली. मध्येच त्याला आवाज देत ती त्याला उठायला सांगत होती.

तिची सगळी आवरा आवर झाली तेव्हा खुपच उशीर झाला होता. नाही म्हणायला या सर्व कामात अर्ध्या तास तरी उलटुन गेला होता!

‘बाई! किती उशीर झाला. उठला तर आणखी ओरडेल!’ मनाशी म्हणत तिने हॉलवरुन नजर फिरवली, सगळं व्यवस्थित साफ झाल्याची खात्री करुन घेत ती किचकडे जायला वळली, तोच दारावरची बेल वाजली!

‘आता कोण?..’ कमरेला खोचलेला पदर काढून सारखा करत ती दरवाजाच्या दिशेने जायला लागली. एका हाताने कपाळावर आलेल्या बटा मागे सारत तिने लॉक काढलं, आणि दरवजा उघडला तर-

बाजुच्याच घरातली स्नेहा झिरझिरित स्लेव्हलेस टॉप अन् शॉर्ट जिनचा स्कर्ट घालून अंगप्रदर्शन करत असल्यासारखी तिच्या समोर उभी!

तिला बघुनच तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं.

स्नेहा ही तिच्या चाळीत राहणार्‍या नटव्या तरुणींपैकी एक होती.

इतर तरुणींच्या मानाने ही जरा जास्तच सुंदर होती. गोरी-गोरी पान, शिडशिडीत- पण योग्य ठिकाणी टच्च भरलेली, घाटदार बांधा, संत्र्यांच्या फोडीसारखे रसरशीत दिसणारे फिक्कट गुलाबी ओठ, गुबरे-गुबरे गाल अन् टवटवीत चेहरा. सगळं काही अगदी ठासून भरल्यासारखं होतं तिच्यात. आणि म्हणूनच चाळीतली एकुणएक मुलं हिच्या मागं लाळ घोटत होती! घाणेरड्या कमेन्ट पास करत होती.

-ही सुद्धा काही कमी नव्हती.

मुलं अशी बघताहेत हे माहीत असुनही, त्यांना आणखीन प्रोत्साहन वगैरे दिल्यासारखं ही रोज नवनवीन फॅशनची कपडे घालत होती. त्यात जास्तकरुन तिच्या शरीराचा जास्तीत-जास्त भाग कसा उघडा पडेल, याकडेच तिचा जास्त कल होता. त्यात मग ती कधी ती लो-कट, फिट्ट असा टी शर्ट घाली- कि ज्यातून छातीचे भरभरुन प्रदर्शन होई. तर कधी मग अगदी तोकडी पॅन्टी घालून ती लुसलुशीत मांड्यांचं प्रदर्शन करि! एकदा तर हीने स्लॅक्स आणि त्यावर नुसताच एक व्हाईट कलरचा शर्ट घातला होता. कितीतरी मुलं त्यातून दिसणार्‍या तिच्या भरीव उरोजांवर विकृत नजरांनी बघत त्याची गोलाई चाचपत होती!

शी!!

-आणि असलीच ही सटवी आता तिच्या समोर उभी रहीली होती!

“ह्?” तिनं कापाळाला भरमसाठ आठ्या पाडत तिच्याकडे प्रश्नार्थक हुंकार भरला, त्यावेळी तिची नजर सॅमन्थाच्या घरात कोणालातरी शोधत होती!

“काय पाहिजे?” शेवटी तिने न राहावून विचारलं.

“मी.. ते- मला..” म्हणत ती पुन्हा एकदा तिच्या मागे डोकावू लागली. कोणालातरी शोधू लागली! कोणाला कशाला, मॅकलाच शोधत होती ती! पण जोपर्यंत ती स्वत:हून बोलत नव्हती, तोपर्यंत सॅमन्थाला काही बोलता येणार नव्हतं. पण तरीही- आत्ता जर तिच्या तोंडून मॅकचं नाव आलं असतं ना, तर तिथेच समन्थाच्या हातून काहीतरी विपरित घडलं असतं!

“काय??” तिच्या तशा बघण्याने तिने तडकून विचारले.

“नाही.. म्हणजे, ते तुमच्या घरात-” तिचं वाक्य पुर्ण व्हायच्या आतच मॅकची हाक तिच्या कानावर आली!

“अSS?” मान मागे वळवत तिने विचारलं. कोण आलंय म्हणुन तो वैतागतच विचारत होता! त्याच्या बोलण्याचा रोख लक्षात येताच मात्र तिला आपल्या कामाची आठवण आली!

त्याला उठवून आपण त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा पदार्थ करायला आलो आहोत. आता तो उठलाय, दोनच मिनिटांत आवरुन खाली येईल आणि अजुन आपलं कशातच काही नाही!

त्याची जाणीव होताच मात्र तिची चांगलीच धांदल उडाली.

“नाही रेS, कोSणी नाSही आलं..” गडबडत खाड्कन दरवाजा बंद करत ती म्हणाली.

‘मरु दे तिला. टाईमपास करायला तिचं काय जातंय! रिकामटेकडी कुठली!’ तिच्याकडे दुर्लक्ष करत, ती कशीबशी साडी सावरत किचनच्या दिशेने पळाली..

पटापट भांडी धुवून घेत, तिने पहिल्यांदा दुधाची पिशवी फोडून ते गरम करायला ठेवलं. बारिक कांदा कापून घेत चण्याचं पिठ एका पातेल्यात काढून घेतलं. त्यात चटणी-मिठ-मसाला घालून ते मिश्रण एकत्र केलं. दुसरी शेगडी पेटवून त्यावर कढई ठेवली. त्यात तेल ओतून ते तेल गरम करायला ठेऊन दिलं. तिसर्‍या शेगडीवर चहासाठी आधण ठेवलं. चहापत्ती आणि साखरेचा डबा वर काढून ठेवत, परत एकदा चण्याच्या पिठात पाणी घालत तिने ते चांगलं ढवळून घेतलं. दोन मिनिटं मिश्रण चांगलं ढवळून घेतल्यावर, त्यात हलकासा खायचा सोडा टाकला. एक मोठ्ठी प्लेट- झार्‍या आणि पेपर जवळ घेत तिने कांदा भजी बनवायची सगळी तयारी करुन ठेवली.

कांदा भजी!

मॅकचा खुप आवडता पदार्थ होता हा- मस्त कुरकुरीत अन् गरमागरम कांदेभजी! कॉलेजमध्ये असताना तर दोन-दोन प्लेट हा एकटाच फस्त करुन टाकायचा. खरं म्हणजे तिला ते करता येत नव्हते. ती ख्रिश्नन; त्यांच्यात असला पदार्थ कोणी करत नव्हतं. त्यामुळे तिलाही हे असलं काही करायचा किंवा शिकायचा कधी योग आला नव्हता. पण त्याला मनापासून हे आवडतं म्हटल्यावर, तिला ते शिकणं गरजेचं होतं. त्यासाठी तिने एका मैत्रिणीला गाठले. तिच्याकडे सलग दोन आठवडे हेलपाटे मारुन तिने खमंग, कुरकुरीत कांदा-भजी शिकून घेतले. अर्थात हे त्याला तिने कधी कळू दिलं नव्हतं.

-आणि आज.. पहिल्यांदाच ती आपल्या हातांनी बनवलेला हा पदार्थ त्याला खाऊ घालणार होती. त्याला आश्चर्याचा धक्का देणार होती!

पहिला धक्काही तिनं असाच दिला होता. त्यावेळी तर चक्क सिल्कची साडी नेसली होती तिने! तोंडाचा आ वासून तो नुसताच बघत राहीला होता. आजपर्यंत कधीही साडीचं नावही न घेतलेली मुलगी पहिल्यांदाच साडी कशी काय नेसली हे पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं- आनंदही वाटला. ती आपली संस्कृती शिकत असल्याचा अभिमान वाटू लागला.

कसा खट्याळपणे गोड हसत होता तो? त्याला तसं पाहिल्यावर तिलाही आनंद झाला होता..

तसं बघायला गेलं तर मॅक हा तिच्या धर्माचा नव्हता. त्याचं खरं नाव मनोहर होतं. धर्माने तो हिंदू होता. पण तिच्या प्रेमाखातर त्याने सर्व काही सोडून दिलं होतं. इतरांचा विरोध सहन करुन तिच्याशी विवाह केला होता!

किती? हार्डली महिन्याभरापुर्वीचीच गोष्ट ती- एका युथ फेस्टीव्हलमध्ये तिची भेट झाली होती त्याच्याशी. आणि त्यातच ती त्याच्या प्रेमात पडली!

हळूहळू ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रित झालं आणि सॅमन्थाने सरळ प्रपोजच करुन टाकलं…

“माझ्याशी लग्न करशील मॅक…..?”

दोन-चार वेळा वाजलेल्या कर्णकर्कश बेलने तिची तंद्री भंगली. समोर कढईतली भजी तांबुस काळपट पडली होती. विचारांच्या ओघात ती हलवायचीसुद्धा विसरली होती! घाईघाईत तिने भजी प्लेटमध्ये काढत, उकळत्या चहाची शेगडी बंद केली. तोपर्यंत डोअरबेल चिडखोर आवाजात वाजतच होती.

‘कोण आलंय?’ ती दरवाजा उघडायला गेली…

‘आलेS, एक मिनिट!’ म्हणत तिने दरवाजा उघडला अन्..

फट्टकन तिच्या चेहर्‍यावरचा रंग उडाला! गोठल्यासारखी ती नुसतीच समोर बघत राहीली!

‘क-कोण पाहिजे?’ न कळत तिची जीभ चाचरली. समोर एक सब-ईन्स्पेक्टर आपल्या पाच साथीदारांसह बाहेर उभा होता! आणि त्याच्याच बाजुलाच ती सटवी उभी होती- स्नेहा!

“तुमचं नाव?”

“सॅमन्था”

“हे घर..”

“म-माझ्या आंटीचं. ती गोव्याला असते”

“घरात आत्ता कोणी आहे का?”

तिची मान आपसूकच नकारार्थी हलली! त्याच वेळी एका लेडी पोलिसने सॅमन्थाला आत ढकलत खाडकन दरवाजा उघडला.. क्षणात सब-ईन्स्पेक्टर उदयच्या कपाळावर आठ्या पडल्या!

“माने- नेमाडे, बघा रे आत!” जोरात ओरडत त्याने हुकूम सोडला.

“क- काय झालं सर, घरात कोणी नाही प्लिज तुंम्ही विश्वास का ठेवत नाही? हे बघा.. हे बघा, असं बळजबरी घराची झडती घेऊ शकत नाही तुंम्ही- मी..”

“ए- चुप!” आपल्या करड्या आवाजात लेडी पोलिस खेकसली.

“साहेब, पोरगी पक्की पोचलेली दिसतेय” म्हणत तिने तिच्याकडे मोर्चा वळवला..

“ए- सांग काय ठेवलंयस घरात?”

“अ?.. प्लिज मॅडम तुंम्ही…”

“एSS..” जोरात सॅमन्थाच्या हाताला हिसडा देत तिने तिला दूर ढकलली आणि तशीच ती मागच्या जाड काचेच्या पॉटवर जाऊन आदळली!

खळ्ळकन् पॉट फरशीवर पडून फुटला.. सगळ्या हॉलभर त्याचे तुकडे विखुरले गेले!

त्याचवेळी वरच्या माळ्यावर नेमाडे बेबीच्या देठापासून बोंबलला!…..

“घेऊन चला तिला” शांतपणे समोर बघत उदय म्हणाला..

“किती दिवस होतं हे?”

“माहीत नाही सर, पण चार महीने तरी झाले असतील!”

“चार महीने? इतक्या दिवस काय, नाकाला फडकी बांधून हिंडत होता की काय, न समजायला!”

उदयच्या बोलण्याने ती जराशी चाचरली.. गप्प झाली.

“समजलं कसं नाही तुंम्हाला? बाजुलाच घर आहेत ना तुमची?” तिच्याकडे बघत जरा नरमाईने घेत उदयने विचारले, कारण बातमी देणारी तिच होती!..

“हो सर, पण गेले चार महीने ती सर्व दरवाजे-खिडक्या बंद करुन ठेवत होती. बाहेर जातानाही दरवाजाला कुलुप लावून जात होती. मग कसं समजणार? आणि हिचा चेहराही इतका भोळा, कि ही असं काही करेल, म्हणून कोण स्वप्नातही विचार करु शकत नाही!”

“मग आज कसं लक्षात आलं?”

“आज वास आला! म्हणजे कसं कोणास ठाऊक पण तिने वरच्या माळ्यवरची खिडकी उघडी ठेवली होती. त्यामुळे जास्तच वास सुटला. मला संशय आला म्हणून मी तिला विचारायला घरी गेले, तर..”

“तर?”

“तर तिने अर्धवट दरवाजातच मला ‘कोण पाहिजे म्हणून विचारलं. मी आत बघायला लागले तसं तिनं आडवा हात धरत माझी आत जाण्याची वाट बंद केली. मग अचानक मागे वळून तिने कोणालातरी ओ दिली!”

“कोणाला?”

“कोणाला… असं नाही, कारण कोणी आवाजच दिला नव्हता तर! ती नुसतीच त्याला सांगत होती ‘कोणीच आलेलं नाही म्हणून!’ नंतर तर सरळ तोंडावरच दरवाजा बंद करुन टाकला तिने!”

उदय काही बोलला नाही. एका हवलदाराला तिचं स्टेटमेंट लिहायला सांगून त्याने दुसर्‍या एका तरुणीला आत बोलावलं.

“तुझं नाव?”

“राणी”

“तू हीची मैत्रिण ना?”

“ह्- हो, म्हणजे मी- सॅमन्था आणि मनोहर दोघांची क्लोज फ्रेन्ड होती”

“मागच्या काही महीन्यांत त्या दोघांत काही भांडण वगैरे झालं होतं का? कि अगोदरपासूनच काही वैर होतं?”

“नाही सर, ही तर त्याच्यावर खुप प्रेम करत होती. तिने स्वत: माझ्याजवळ असं बोलून दाखवलं होतं. कोणी परवानगी दिली नाही तर सरळ पळून जाऊन लग्न करु- असंही ती म्हणाली होती”

“आणि मनोहर? त्याचं काय म्हणणं होतं?”

“काही नाही- कारण तो तिच्यावर प्रेमच करत नव्हता!”

“तो बोलला तसं तिला?”

“नाही. पण त्याच्या वागण्यातून ते स्पष्ट होत होतं. तो सॅमन्थाला इग्नोर करायचा”

“मनोहरची शेवटची भेट तुला आठवतेय?”

“हो. ज्यादिवशी सॅमन्था त्याला प्रपोज करणार होती, त्याच दिवशी तो कॅन्टीनमध्ये आमच्याबरोबर बोलत बसलेला होता, नंतर सरांनी त्याला काहीतरी कामानिमित्त कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या गार्डनमध्ये बोलावलं म्हणून तो निघून गेला”

“आणि सॅमन्था?”

“तीन महिन्यांपुर्वी ती सतत माझ्या घरी येत होती, एकदा साडी कशी घालतात ते शिकायला, मग कांदाभजी शिकायला. त्यावेळी मी त्याचं कारण विचारलं तर तिने काही सांगितलं नाही, फक्त कोणालातरी सरप्राईज द्यायचं आहे एवढंच तिने सांगितलं”…..

उदय प्रश्न विचारत माहीती काढत होता, समोरच लॉकअपमध्ये बसलेली सॅमन्था शून्यात कुठेतरी बघत बसली होती. तो दिवस पुन्हा एकदा तिच्या डोळ्यांसमोर तरळत होता…..

“मॅक- आय लव्ह यु, मॅक”

“डोन्ट कॉल मी मॅक!” तो तिच्यावर जवळ-जवळ खेकसलाच!

“माझं नाव मनोहर आहे! आणि मी तुझ्यावर प्रेम करत नाही- म्हणून सांगितलं ना एकदा?”

“असं करु नकोस मॅक, प्लिज. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत”

“स्टॉप इट!!!” तिचा हात झिडकारत तो उद्गरला.

“माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस- रस्ता सोड, मला जाऊ दे..”

 

“माझ्याशी लग्न करशील मॅक?” तिनं आशाळभुत नजरेने त्याच्याकडे बघत विचारले आणि भप्पकन त्याच्या मेंदूने पेट घेतला!

“स्टुपिड!!!… वेड लागलंय का तुला?? मी सांगतोय मी तुझ्यावर प्रेम करत नाही- आणि तू सरळ लग्नापर्यंत पोहोचलीस?”

तसाच रागाने तो जायला वळला अन्…

ओढणीत टाकलेला दगड तिने फट्टकरुन त्याच्या मागुन डोक्यात जोरात हाणला..

एकदा.. दोनदा.. तिनदा..

त्याच्या मस्तिष्काचा लगदा होईपर्यंत ती मारत राहीली.

तो शुद्ध हरपून खाली कोसळला.. त्याचं शरीर सैलावलं. हालचाल बंद झाली.. खाली बसत ती बेसुमार रडत राहीली!

 

सहा वाजत आले. गार्डनच्या त्या टोकाला चिटपाखरुही उरलं नव्हतं. शबनममधून मफलर काढत, तिने ते हळूवारपणे त्याच्या डोक्याला लपेटायला सुरवात केली.. बाजुच्याच गार्डनच्या पाईपामधून सुळ्ळकन येणारं पाणी, खाली पडलेल्या त्याच्या रक्ताच्या शिंतोड्यांना जमिनीत मुरवत होतं!

“साहेब- साहेब तिनं काहीच केलं नाही, प्लिज तिला सोडा” कळवळून दोघेजण उदय समोर येत म्हणाले.

“हे कोण?”

“हे तिचे आई-वडील आहेत, सर” हवलदाराने माहीती पुरवली.

“तुम्हाला माहीत आहे- तुमच्या मुलीने काय करुन ठेवलंय ते?”

“साहेब, हात जोडते- पाया पडते वाटलं तर. पण माझ्या पोरीला सोडा, पुन्हा ती असं करणार नाही”

उदय त्यांची किव करत हसला!

“सोडून द्यायला काय चोरी केलीय काय तिनं कुठे?- एका तरुणाचा खुन केलाय! तेही चार महीने त्याला घरात कुजत ठेवलंय!”

“आई आहे हो तिची. मुलीच्या काळजीनं बोलतेय..”

“आई? ती बघा-” समोर निर्देश करित तो म्हणाला.

तिथे बाकावर एक चाळीशीची बाई अस्तास्वस्त बसलेली होती. रडून-रडून तिचा चेहरा सुजला होता. डोळे लाल झाले होते. मेलेल्या मढ्यासारखी ती एकटक कुठेतरी अर्थहीन बघत होती!

“ती पण एक माऊलीच आहे- आणि तिच्याच मुलाला हीने जीवं मारुन टाकलंय! काय वाटलं असेल त्या माऊलीला, आपला मुलगा असा मेलेला बघून?”

“साहेब..”

“हे बघा मी काहीएक करु शकत नाही! केस रजिस्टर झालेय. तुंम्हाला जे काय बोलायचं ते…” गप्पकन उदय बोलायचा थांबला!

तोंडावर हात ठेऊन जोSरात किंकाळी फोडत स्नेहा मागे सरकली..

सॅमन्थाची आई तिथेच घेरी येऊन पडली!

समोर लॉकअपमध्ये सॅमन्था…

 

“हॅलो ह्ं मॅक- अरे काळजी कशाला करतोयस? आता येतेय ना मी तुझ्याकडे!.. अ‍ॅ?.. काय?…. चावट! गाणं का?…”

म्हणत तीने फोन दुसर्‍या हातात घेतला…

फोन?

-अह्ं‍!

फोन नव्हताच तिच्या हातात- मोकळा हाताचा पंजा कानावर ठेवत बडबडत होती ती.. आणि…

एखादं बिगर वापराचं कापड टराटर फाडून काढावं तसं, कोपरापासून मनगटापर्यंतचा सगळा हात एका काचेच्या धारदार तुकड्यानं चिरुन काढत होती!

त्या दृश्याकडे बघूनच उदय बधीर झाला. गेल्या तीस वर्षाच्या त्याच्या सर्विसमध्ये त्याने असा प्रकार पाहिला नव्हता!…

सॅमन्थाच्या कापलेल्या हातातून, लोंबणार्‍या मांसाच्या चिंध्या तिच्या चालण्याबरोबरच लॉकअपच्या जमिनीवर लालभडक रक्ताचा सडा पाडत होत्या!

मध्येच ती बोलायची थांबली.. एका संथ लयीत तिनं गाणं म्हणायला सुरवात केली…

 

“हमें तुमसे.. प्याS र कितनाSS…

येS हमSS… नही.. जाS नतेSS…

मSगर.. जी नहीSS… सकते… तुम्हाSरे बीनाS!….”

झट्कन उदय सावध झाला. एका झेपेत त्यानं लॉकअप गाठलं.. त्याच वेळी सॅमन्थाने हातातली काच खस्सकन् गळ्यावरुन फिरवली!

क्षणात खेळ खल्लास!

सॅमन्थाला तडफडत पाहण्याशिवाय उदयजवळ काहीच पर्याय नव्हता…

बोर्डावरुन चावी आणून, कुलुप काढून, लॉकअपचा दरवाजा खोलेपर्यंत तरी वेळ हवा ना त्याला!

 

—समाप्त—

 

[[Note: सत्य घटनेवर आधारित]]

About annu2

i m very sensitive but free minded person

Posted on March 21, 2018, in कथा, क्राइम, थ्रिलर, पुस्तके, रोमॅन्टीक, सस्पेंन्स and tagged , , . Bookmark the permalink. 5 Comments.

  1. दत्ता उतेकर

    खूप छान… जबरदस्त… तुमची लेखणी खूप जबरदस्त आहे… फक्त एक विचारायचं होतं की असंभव कथा कधी पूर्ण करणार आहात खूप आतुरतेने वाट पाहतोय ओ आम्ही सगळे🙏🙏❤️

  2. आपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर http://www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.

  3. आपण इतक्या वर्षांनी पुन्हा आलात तेहि एक दमदार कथा घेऊन त्याबद्दल आभार !!
    पण आता लवकरात लवकर “असंभव” चा पुढचा भाग अपडेट करा. गेली 3 वर्षे उत्सुकता शिगेला पोचलि आहे.

Leave a comment